सातारा प्रतिनिधी । सातारा शहरामध्ये अगोदरच पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक देखील त्रासले आहेत. अशातच पालिकेपासून काही अंतरावर असलेल्या ‘सर्वोदय हाऊसिंग सोसायटी’ला पाणीपुरवठा करणार्या एका जलवाहिनीला गळती लागण्याच्या प्रकार नुकताच घडला. या जलवाहिनीच्या लागलेल्या गळतीमुळे ४ महिन्यांत लाखो लिटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे हीच गळती वर्षभरापूर्वी पालिकेने दुरुस्त केली होती; मात्र, गळती काढण्याचे काम पूर्णतः होऊ शकले नसल्याने पुन्हा गळती चालू झाली आहे.
दरम्यान, ‘सर्वोदय हाऊसिंग सोसायटी’ला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला गळती लागल्यानंतर स्थानिकांनी अनेकवेळा पालिकेकडे पाठपुरावा देखील केला. नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर ही गळती पालिकेकडून काढण्यात आली. मात्र, गेल्या ४ महिन्यांपूर्वी पुन्हा गळती चालू झाली. यामुळे आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
याविषयी स्थानिकांनी पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकार्यांना अनेक वेळा विनंती केल्यानंतर त्यांनी कर्मचारी पाठवले. मात्र, कर्मचार्यांना गळती आढळून आली नाही. पुढे नगरपालिकडून हीच गळती काढण्यासाठी २ पथके पाठवण्यात आली. मात्र, त्यांनाही गळती आढळून आली नाही. त्यामुळे ही गळती अजूनही तशीच आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचार्यांनी ही गळती काढण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.