सातारा प्रतिनिधी । आशिया खंडातील सर्वात पहिली जलउपसा सिंचन योजना टेंभू उपसा सिंचन योजना हा प्रकल्प 1996 साली सुरू झाला. महत्वकांशी असलेल्या या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ७ हजार ३७०.०३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाकडून हिवाळी अधिवेशनावेळी गुरुवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १०९ गावांमधील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली येणार आहे. तसेच, टेंभूला पूर्वी २२ टीएमसी पाणी मिळत होते. त्यामध्ये नव्या मान्यतेने ८ टीएमसी पाण्याची भर पडणार हे नक्की.
आशिया खंडातील सर्वात पहिली जलउपसा सिंचन योजना म्हणून ओळख असलेल्या टेंभू योजनेमध्ये सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील २४० गावांमधील ८० हजार ४७२ हेक्टर शेतीला पाणी देण्याचे नियोजन होते. त्यानुसार मुख्य कालव्यासह वितरण व्यवस्थेची कामे झाली आहेत. या कामावर आजअखेर ३ हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांच्या द्वितीय सुधारित खर्चास शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली होती.
या योजनेच्या लाभापासून सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुका वंचित राहिले होते. तसेच योजनेत सहभागी तालुक्यांतीलही काही गावे वंचित राहिली होती. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर व सुमनताई पाटील यांनी शासनाकडे रेटा लावला. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील १०९ वंचित गावांचा टेंभू योजनेत समावेश केला आहे.
यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील १८, खटाव तालुक्यातील २८, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील १५, तासगाव १३, आटपाडी १३, कवठेमहांकाळ ८, जत ४ आणि सांगोला तालुक्यातील १० गावांचा नव्याने समावेश झाला आहे. त्यामुळे या ८ तालुक्यांतील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने अतिरिक्त ८ टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे.
जिल्ह्यातील या गावांचा नव्याने समावेश
1) खानापूर तालुका : भिकवडी (बु.), करंजे, रेणावी, रेवणगांव, भडकेवाडी, घाेटी (बु.), घोटी (खु.), धोंडगेवाडी, ऐनवाडी, जखीनवाडी, जाधववाडी, घाडगेवाडी, बानुरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी,
2) तासगाव तालुका : वायफळे, बिरणवाडी, यमगरवाडी, दहिवडी, कचरेवाडी, किंदरवाडी, नरसेवाडी, धोंडेवाडी, विजयनगर, सावळज, डोंगरसोनी, वडगाव, लोकरेवाडी,
3) कवठेमहांकाळ : गर्जेवाडी, कुंडलापूर, रायवाडी, केरेवाडी, शेळकेवाडी, जाखापूर, जायगव्हाण, लोणारवाडी,
4) आटपाडी : आंबेवाडी, बोंबेवाडी, राजेवाडी, काळेवाडी, खाजोडवाडी, लिंगीवरे, उंबरगाव, पांढरेवाडी, पिंपरी (खु.), पुजारवाडी (दिघंची), विभूतवाडी, गुळेवाडी, पडळकरवाडी जत : बेवनूर, नवाळवाडी, वाळेखिंडी, सिंगणहळ्ळी.