सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी कमी झाल्याने ८१ गावे २९१ वाड्यांना ८२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ३५ गावे २४१ वाड्यांना ४२ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
माण, खटाव, फलटण, कोरेगाव या चार तालुक्यांत दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने भूजल पातळीत घट होत असून आगामी काळात आणखी टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परतीचा पाऊसही झाला नसल्याने भूजल पातळीत वाढ झाली नाही.
मार्च- एप्रिलमध्ये निर्माण होणारी परिस्थिती ऑक्टोबरपासून असल्याने दुष्काळाची दाहकता वाढणार हे ओळखून प्रशासन सतर्क झाले आहे. अनेक ठिकाणी पाझर तलाव कोरडे पडले आहेत. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यातच चार तालुक्यात दुष्काळाची दाहकता आहे.
अशी आहे जिल्ह्यातील परिस्थिती
जिल्ह्यात सद्यस्थितीत एक लाख ३१ हजार ५७४ लोकसंख्या व ८२ हजार ८०३ पशुधनाची तहान टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. माण तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू असून ३४ गावे, २४१ वाड्यांमध्ये ५८ हजार ६६० नागरिकांना ४२ टँकरमधून पाणी, फलटण तालुक्यात १२ गावे असी स्थिती आहे. पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांमध्ये प्रशासनाकडून युध्दपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत.