सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. सध्या जिल्ह्यात २ लाख ४१ हजार १०४ लोकांना १४२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यास टंचाईच्या झळा बसत असल्याने सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भीषण होऊ लागली आहे. जिल्ह्यात तब्बल आठ तालुक्यांत १३२ गावे व ५४० वाड्यावस्त्यांवरील दोन लाख ४१ हजार १०४ लोकांना १४२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात टंचाईच्या झळा सर्वाधिक माण तालुक्यात जाणवत आहेत.
माण तालुक्यात ५६ गावे व ३६५ वाड्यावस्त्यांवर ७३ टँकर सुरू असल्याने पाणीटंचाईची भीषणता दिसून येत आहे. माण पाठोपाठ खटाव तालुक्यात टंचाईच्या झळा बसत आहे. खटाव तालुक्यात २६ टँकरद्वारे ३० गावे व १०६ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यात २० टँकरद्वारे २२ गावांत पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यात १६ टँकरद्वारे २० व ७२ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे.
पाटण तालुक्यात तीन वाड्यावस्त्यांवर तीन टँकरद्वारे, वाई तालुक्यात दोन टँकरद्वारे दोन गाव व तीन वाड्यावस्त्यांवर, खंडाळा तालुक्यात एका टँकरद्वारे एका गावात, कराड तालुक्यात एका गावात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे.