कराड प्रतिनिधी । पावसाळा जवळ येत असल्यामुळे जिल्ह्यात पालिकांनी शहरातील पावसाळापूर्व उपाय योजनांची कामे हाती घेतली आहेत. अशात सातारा पालिकाही मागे नाही. सांबरवाडी येथील फिल्टर बेडच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पालिकेकडून सोमवारी (दि. 10) हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे सोमवार आणि मंगळवारी कास योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालिकेच्या कामामुळे सोमवारी पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी, डोंगराळ भागातील बालाजीनगर, कांबळे वस्ती, जांभळे वाडा या भागासह कात्रेवाडा टाकीतून होणारा सायंकाळ सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर मंगळवारी (दि. 20) सकाळ सत्रातील पॉवर हाऊस येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार केले आहे.
तसेच यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ तसेच कात्रेवाडा टाकी, कोटेश्वर टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी व कोटेश्वर टाकीतून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
‘या’ योजनेचे पाणीही राहणार बंद
सातारा शहरात ज्या प्रमाणे पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे त्याप्रमाणे महाविरण विभागाकडून बुधवार, दि. 21 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत शेंद्रे सबस्टेशन ते शहापूर येथील उच्चदाब विद्युतवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे शहापूर योजनेचा विद्युतपुरवठा बंद राहणार असल्याने पाणी उपसा केंद्रातून शहरातील वितरण टाक्यांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. परिणामी दि. 21 रोजी दुपारच्या सत्रात यशवंत गार्डन टाकीतून तर दि. 22 रोजी गुरुवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा टाकी, बुधवार नाका या टाक्यांद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.