जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात सर्वाधिक 350 ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ३५० ठिकाणी ५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने युध्दपातळीवर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

सातारा जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. परतीचा पाऊसही झाला नसल्याने भूजल पातळीत वाढ झाली नाही. मार्च- एप्रिल महिन्यांमध्ये निर्माण होणारी परिस्थिती ऑक्टोबरपासून दिसून आल्याने यावर्षी दुष्काळाची दाहकता वाढली आहे. अनेक ठिकाणी पाझर तलाव कोरडे पडले असून धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यापासूनच जिल्ह्यातील चार तालुक्यांत दुष्काळाची दाहकता असून पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनू लागला आहे.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्यात येत असल्या तरी यावर्षी दुष्काळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात चार तालुक्यांत भीषण टंचाई असून एप्रिल आणि मे महिन्यांत जिल्ह्याच्या बहुतांश भागात अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

2 लाख 13 हजार नागरिक, सव्वा लाख पशुधनासाठी टॅंकर

जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन लाख १३ हजार लोकसंख्या व एक लाख २३ हजार ८५ पशुधनाची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ५५ टँकर सुरू असून ५१ गावे, २९९ वाड्यांमध्ये ८९ हजार ९२२ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यात २४ गावे ९ वाड्या, फलटण तालुक्यात १९ गावे ६८ वाड्या, कोरेगाव तालुक्यात २२ गावे, वाई तालुक्यात दोन गावे, ३ वाड्या, खंडाळा व कराड तालुक्यात एका गावात तर पाटण तालुक्यात तीन वाड्यांवर टंचाइची परिस्थिती दिसून येत आहे. पाणी टंचाई निर्माण होणाऱ्या गावांमध्ये प्रशासनाकडून युध्दपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत असून पाणीटंचाइची मोठी समस्या आगामी काळात भेडसावणार आहे. टॅंकरची मागणी झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ टॅंकर सुरु करावेत, अशी मागणी होत आहे.