पुलाच्या कामावेळी जलवाहिनी फुटल्याने शाहूपुरीत पाणीपुरवठा झाला ठप्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील शाहूपुरी भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी फुटल्याने या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ऐन उन्हाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

सातारा पालिकेच्या वतीने शाहूपुरी चौकालगत असलेल्या जुन्या पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आज सकाळी या कामासाठी खोदकाम केले जाय होते. हे काम सुरु असतानाच कण्हेर योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. याशिवाय शाहूपुरीचा दैनंदिन पाणीपुरवठा ठप्प झाला.

मंगळवारी पाणीकपात व बुधवारी पाणीच न आल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. दरम्यान, पालिकेकडून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे; परंतु हे काम पूर्ण न झाल्यास येथील रहिवाशांना गुरुवारी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकताे.

त्यामुळे जीवन प्राधिकरणच्या वतीने शाहूपुरी भागाला तात्पुरत्या स्वरुपात कृष्णा योजनेतून पाणीपुरवठा केला जावा, कोटेश्वर उपसा केंद्रातील पंप नादुरुस्त असतील तर ते तातडीने दुरुस्त करून घ्यावेत, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, पालिकेकडून काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

साताऱ्यात ‘या’ ठिकाणी प्राधिकरणच्या जलवाहिनीला गळती

साताऱ्यातील महानुभव मठाजवळ असलेल्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला बुधवार सकाळी गळती लागली. त्यामुळे या ठिकाणी देखील हजारो लीटर पाणी वाया गेल्याने महानुभव मठ व आकाशवाणी झोपडपट्टी परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.