सातारा प्रतिनिधी । सातारा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या वाहिनीस लागलेली गळती काढण्याचे काम पालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा शहरात गुरुवारी, दि. १७ आणि शुक्रवारी दि. १८ या दोन दिवशी योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
कास योजनेच्या वाहिनीस आटाळी व कासाणी गावच्या हद्दीत गळती लागल्याने सांबरवाडी येथील टाक्यांना कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. गळती रोखून पाण्याची साठवण पुर्ण क्षमतेने होण्यासाठी याठिकाणी पालिकेच्यावतीने गुरुवारी (ता.१७) वाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी १० ते १२ तास लागणार असल्याने उद्या गुरुवार ,दि. १७ रोजी सायंकाळच्या सत्रात पोळवस्ती, संत कबीर सोसायटी, बालाजी नगर, कांबळे वस्ती, जांभळेवाडा, तसेच कात्रेवाडा टाकीवर अवलंबून असणाऱ्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच दि. १८ रोजी सकाळच्या सत्रात यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ, तसेच कात्रेवाडा, गुरुकुल, व्यंकटपुरा, भैरोबा, कोटेश्वर टाकीच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दि. १९ व दि. २० रोजी कासच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. याकाळात नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन बापट यांनी पत्रकाद्वारे केले आहे.