सातारा प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर दोनशेच्या घरात गेलेली टॅंकरची संख्या २४ वर आली आहे. जिल्ह्यात सध्य परिस्थितीत पाच तालुक्यातील ३१ गावे व १३३ वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाच्या आगमनानंतर सहा तालुक्यातील पाणी टॅंकर बंद झाले आहेत. दोनशेच्या घरातील टॅंकरची संख्या अवघ्या २४ वर आल्याने प्रशासनावरील ताण कमी होवून प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा होणारी गावे व वाड्यांची संख्या हजाराच्या घरात गेली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने टॅंकरच्या संख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांना मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता.
जून महिन्याच्या सुरुवातीस जिल्ह्यात २०० टँकरद्वारे प्रशासनाकडून पाणी पुरवठा करण्यात येत होता. एकट्या माण तालुक्यात सर्वाधिक ८५ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. पाणी टंचाइमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांत पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने हजारांच्या घरात गेलेल्या टॅंकरच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात सातारा, कराड, महाबळेश्वर, फलटण, पाटण, जावळी या तालुक्यात सध्या एकही टॅंकर सुरु नसल्याचे माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली.
जिल्ह्यात टॅंकरची संख्या २४ वर
सातारा जिल्ह्यात सध्याच्या घडीला ५६ हजार ८९६ लोकसंख्या व १० हजार २९३ पशुधनाची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे. माण तालुक्यात १४ टँकर सुरू असून १८ गावे, १२७ वाड्यांमध्ये ४३ हजार ९७५ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यात ३ गावे १ वाड्या, कोरेगाव तालुक्यात ४ गावे, वाई तालुक्यात ५ गावे ५ वाड्या, खंडाळा तालुक्यात एका गावांमध्ये टंचाइची परिस्थिती दिसून येत आहे. जिल्ह्यात १६ विहिरी व ७ बोअरवेल प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. पावसाच्या आगमनानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागातील पाणी समस्या मिटत आली असून पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास येत्या आठ दिवसात मोठ्या प्रमाणात टॅंकर कमी होणार आहेत.