सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून गुरुवारी सायंकाळी सांडव्यावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे आज अखेर ५५ इंच पावसाची नोंद झाली आहे.
महाबळेश्वरमध्ये ०१ जून ते ०१ जुलै या एका महिन्यात ८७०.६० मिमी (३४.२७ इंच ) पावसाची नोंद झाली होती. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने जोर धरला होता. कोसळणाऱ्या या पावसामुळे वेण्णा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती.
मागील दोन दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरु होता. आता पुन्हा पावसाने पुनरागमन केले असून या संततधार पावसाने महाबळेश्वर – पाचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरल्याने गुरुवारी सायंकाळी वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले. याच वेण्णा तलाव मधून महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.