सातारा प्रतिनिधी । पावसाने ओढ दिल्याने पुर्वेकडील सिंचनासह पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट बनली आहे. कोयना धरणातून पाणी सोडण्याची विनंती सांगली महापालिकेकडून पाटबंधारे विभागाला करण्यात आल्यानंतर शनिवारी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील एक युनिट कार्यान्वित करून १०५० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
कृष्णा नदीचे पात्र पडले कोरडे
कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्याने अनेक ठिकाणी तळ गाठला आहे. काही ठिकाणी पात्र कोरडे पडू लागले आहे. ऑगस्ट महिन्यात कृष्णा नदीचे कोरडे पात्र सांगलीकर बऱ्याच वर्षांनी पाहत आहेत. सध्या आयर्विन पुलाच्या खालचे कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे.
महापालिकेकडून पाणी सोडण्याची विनंती
कृष्णा नदीने काही ठिकाणी तळ गाठला आहे. सांगली, कुपवाड शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळ आठवडाभर पाणी उपसा होईल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्याची विनंती सांगली महापालिकेने पाटबंधारे विभागाला केली होती.
पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याची मागणी
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या विनंतीवरून सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरण व्यवस्थापनाकडे पाणी सोडण्याची मागणी केली. मागणी होताच कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
कोयना धरणात ८५ टीएमसी पाणीसाठा
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. धरणात सध्या ८५.६६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पावसामुळे धरणात प्रतिसेकंद ७,१६३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पुर्वेकडे पावसाने आणखी ओढ दिल्यास पाणी टंचाईचा प्रश्न बिकट होऊ शकतो.