सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील सोळशी, नायगाव, नांदवळ, सोनके या चार गावांच्या परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल दि. १४ रोजी नायगाव येथील महिलांनी ग्रामस्थांच्या वतीने गावात हंडा मोर्चा काढण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात सध्या मार्च महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सोळशी, नायगाव, नांदवळ, सोनके परिसरात आठवडाभरापासून पाणी येत नसल्याची तक्रार महिला तसेच ग्रामस्थांमधून केली जात आहे. अशात गावातील विहिरी आटल्याने पाणी टंचाईत भर पडली आहे.
पाणी मिळावे यासाठी तालुक्यातील उत्तर भागातील नायगाव येथील ग्रामस्थांसह महिलांनी काल गावातून हंडा माेर्चा काढला. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी गावातील ग्रामस्थांसह महिलांनी केली आहे.