सातारा प्रतिनिधी | पावसाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होण्याची शक्यता असते. यातून गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो. याचा विचार करता जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या ५ हजार ४७२ स्त्रोतांची रासायनीक तपासणी मोहीम दि.५ जुलैपर्यंत राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे.
जलसुरक्षकांमार्फत जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील पाणी नमुने गोळा करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजनां, हातपंप, विहीर, विधंन विहीर, मिनी वॉटर स्कीम स्त्रोत,शाळा, अंगणवाडी व वैयक्तीक नळजोडणी असलेली कुटुंबे आदी ५ हजार ४७२ स्त्रोतांचे पाणी नमुने रासायनीक तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीच्या जलसुरक्षकामार्फत गोळा करण्यात येणार आहेत.
पाणी नमुना घेतल्यापासून १२ तासाच्या आत प्रयोगशाळेमध्ये पोहोच करावेत. ग्रामपंचायती मधील नोंदवहीमध्ये त्यांची नोंद घेण्यात यावी. हे पाणी नमुने सोमर्डी, सातारा, खंडाळा व कराड येथील प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत.