सातारा प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतीनिष्ठ गाव म्हणून एकंबे गावची ओळख आहे. या नावलौकिक असलेल्या एकंबे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभाग निश्चितपणे प्रयत्न करेल. त्यातून परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाईल, असा विश्वास सीएसआर विभाग प्रमुख डॉ. लीना देशपांडे यांनी व्यक्त केला.
भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभागामार्फत एकंबे येथे डोंगर पायथ्याला असलेल्या पाझर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ डॉ. देशपांडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शनिवारी झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
एकंबे येथील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोरेगाव तालुक्यातील सर्वाधिक शेती क्षेत्र असलेले गाव म्हणून एकंबे गावाचा नावलौकिक आहे. या गावाच्या विकासामध्ये भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभाग नेहमीच योगदान देईल, असेही डॉ. देशपांडे यांनी सांगितले.
शहाजीराव क्षीरसागर यांनी सांगितले की, कोरेगाव तालुक्याच्या मूलभूत विकासामध्ये भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभागाने अमूल्य योगदान दिले आहे. वाडी वस्ती आणि मोठमोठ्या गावांचा कायापालट करण्यात आला आहे. अनेक गावातील दुष्काळ संपुष्टात आला असून गावेच्यागावे पाणीदार झाली आहेत. शेती क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाली असून ग्रामीण भागाचा आर्थिक विकास झाला असल्याचे त्यांनी निदर्शनास सांगून दिले. संतोष चव्हाण यांनी भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभागाच्या कामाचे कौतुक केले.
या कार्यक्रमास कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, सीएसआर अधिकारी जयदीप लाड, सरपंच उर्मिला चव्हाण, उपसरपंच अंकुश भोसले, ग्रामपंचायत सदस्या साधना शेळके, दीपाली घाडगे, विठ्ठल मखरे, माजी उपसरपंच विश्वासराव चव्हाण, एम. बी. चव्हाण, संतोष चव्हाण, नाना ताटे, शामराव चव्हाण, नवनाथ शिंदे, कृष्णा चव्हाण, तानाजी शिंदे, चंद्रकांत चव्हाण, सुनील साळुंखे, विशाल साळुंखे व विठ्ठलराव शिंदे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.