साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गॅस पाईपलाईन टाकताना जलवाहिनी फुटली; वाहतूक झाली ठप्प

0
489
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामादरम्यान आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. ड्रिलिंग मशीनद्वारे खोदकाम करताना जमिनीखालील शहराच्या मुख्य जलवाहिनीला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर पसरले. परिणामी संपूर्ण परिसर जलमय झाला.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे १ ते १.३० च्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी जमिनीत छिद्र पाडण्यासाठी ड्रिलिंग मशीनचा वापर केला जात असताना अचानक जलप्राधिकरणाच्या मुख्य पाईपलाईनला भगदाड पडले. त्यामुळे मोठ्या दाबाने पाण्याचे फवारे उडू लागले आणि काही वेळातच संपूर्ण परिसर जलमय झाला.

पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, काही दुचाकीस्वारांना गाड्या ढकलत पुढे न्याव्या लागल्या. तर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ जलप्राधिकरण कार्यालयाशी संपर्क साधला. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेत पाणीपुरवठा बंद केला. मात्र, त्याआधी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले होते.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. भविष्यात अशी दुर्घटना टाळण्यासाठी योग्य नियोजन करूनच कामे हाती घ्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.