जिल्ह्यातील 1750 मतदान केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’चा ‘वॉच’; अनुचित प्रकार घडल्यास होणार कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील विधानसभेच्या मतदानास अवघे काही तासच उरले आहेत. उद्या दि. २० रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात होत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एकूण मतदान केंद्रांच्या ५० टक्के केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. यामध्ये संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, उमेदवारांच्या गावातील मतदान केंद्र, एखाद्या इमारतीत जास्त मतदान केंद्र असल्यास, मागील निवडणुकीत ९० टक्क्यांहून जास्त मतदान झालेल्या मतदान केंद्रांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघात एकूण २६ लाख ४२ हजार ७९४ मतदार असून ३१६५ मतदान केंद्रे आहेत. यापैकी शहरातील आणि ग्रामीण भागात मिळून ५० टक्के म्हणजेच १७५० हून अधिक मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. संवेदनशील केंद्रांसह काही आदर्श मतदान केंद्रांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

वेबकास्टिंगसाठी निवडण्यात आलेल्या मतदान केंद्रामध्ये मतदान गोपनीयतेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने कॅमेरा लावण्यात येणार आहे. मतदानादिवशी संपूर्ण दिवस या कॅमेऱ्याच्या सहाय्याने केंद्रावर मतदान सुरू होण्यापासून संपेपर्यंतच्या सर्व घडामोडींचे चित्रण होणार आहे. हे चित्रण थेट सर्व आठही मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाहता येणार आहे.

विधानसभानिहाय वेब कास्टिंग केंद्रे

फलटण : २३१
वाई : २३८
कोरेगाव : १८३
माण : १९४
कराड उत्तर : १८०
कराड दक्षिण : १९२
पाटण : २१२
सातारा : २८३