सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठेकेदार संस्थेने निर्बिजीकरण प्रक्रियेत चालढकल चालवल्याचा ठपका सातारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी दि. 4 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारे पालिके समोर आंदोलन करणार असल्याची माहिती ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.
याबाबत वाघमारे म्हणाले की, आपण जे आंदोलन करणार आहोत. त्याबाबत प्रशासनाला निवेदनही सादर केले आहे. सातारा पालिकेने कुत्र्यांच्या निर्बिजीकरण प्रक्रियेचा ठेका व्ही केअर नावाच्या संस्थेला दिला आहे. हा ठेका देऊन तब्बल एक वर्ष उलटत आले.
संस्थेने केवळ 82 कुत्र्यांची निर्बिजीकरण केल्याची कागदपत्रे दिली आहेत. साताऱ्यात गडकर आळी शाहूपुरी येथे भटक्या कुत्र्याने अनेक जणांना चावे घेतले. तसेच म्हाडा कॉलनी सदर बाजार येथे भटक्या कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केला. त्यामुळे येथील संतप्त महिलांनी सातारा पालिकेत जाऊन आरोग्य विभागाला घेराव घातला होता.
आता येथील युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी या विरोधात श्वानांची जत्रा आणि कारभारी भित्रा हे आंदोलन छेडले आहे. दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे.
पालिकेचा करणार अनोखा निषेध : गणेश वाघमारे
कुत्र्यांपासून सातारकरांनी सावध राहावे आणि कोणत्या सावधगिरी बाळगाव्यात याबाबत या आंदोलनाच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे. पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारावर या ढिसाळ कारभाराचा निषेध केला जाणार असल्याची माहिती वाघमारे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.