सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील महागणपती मंदिरासमोर वाई तालुका वारकरी पायी आळंदी वारीच्या दिंडीस प्रारंभ करण्यात आला. वेळी तालुका वारकरी संघटना, कृष्णामाई पंचक्रोशी सोहळा, कमंडलू पंचक्रोशी पायी दिंडी, धौम्य ऋषी पायी वारी, मेरुलिंग दिंडी सोहळा एकत्र करून सर्व दिंड्यांचे आळंदीकडे प्रस्थान झाले.
तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष हभप अशोक महाराज पाटणे यांच्या हस्ते विना पूजन करून गणपती घाटावर पंचपदीने पायवारी सुरू झाली. श्री. पाटणे यांनी वाई परिसराला अध्यात्माची फार मोठी परंपरा असून, ती पुढील पिढीपर्यंत रुजवण्याचे काम समस्त वारकरी समूह करत असल्याची भावना व्यक्त केली.
या प्रसंगी युवा नेते विराज शिंदे, डॉ. नितीन सावंत यांच्यासह वारकरी संघटनेचे भरत बागल, शिवाजी चव्हाण, विजय गाढवे, बबन सपकाळ, रवी भिलारे, किशोर भोसले उपस्थित होते. सर्वोदय सेवा ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष संजय जेधे, बाळासाहेब चोरघोटे, रामदास राऊत, नवीन कांबळे, अप्पा मांढरे, सूर्यकांत कणसे यांच्या हस्ते वारकऱ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.