दिंडीसोबत चालत असलेल्या ज्येष्ठ वारकऱ्याला पाठीमागून ट्रकची धडक; जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | दिंडीसोबत चालत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने वारकऱ्याला धडक दिली. त्यानंतर ट्रकच्या पुढच्या चाकाखाली सापडून वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात विडणी, ता. फलटण येथे बुधवार, दि. १० रोजी सकाळी साडेअकरा वाजता झाला. मोतीराम तुळशीराम तायडे (वय ७८, रा. मसला खुर्द, जि. बुलढाणा), असे अपघातात ठार झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भानुदास तायडे (रा. मसला खुर्द, जि. बुलढाणा) हे व त्यांचा चुलत भाऊ मोतीराम तायडे हे बुलढाण्यावरून आलेल्या दिंडीत सहभागी झाले. पालखी रथाच्या मागे लोकांसमवेत ते चालत निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या (एमएच १२ ईक्यू ५९३०) या ट्रकने मोतीलाल यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे ते खाली पडले. ट्रकच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली ते सापडले. अशा अवस्थेतही ट्रकचालकाने त्यांना ५ ते ७ फूट फरफटत नेले. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर संबंधित ट्रकचालक वारकऱ्याला कोणतीही मदत न करता ट्रक घेऊन तेथून निघून गेला. मात्र, काही वारकऱ्यांनी ट्रकचा नंबर पाहिल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. या अपघातप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकावर भारतीय न्याय संहिता कायदा (बीएनएस) कलम ३४१, १२५ अ, ब १०६ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ अ, बप्रमाणे हलगर्जी मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फाैजदार हांगे हे अधिक तपास करीत आहेत.