सातारा प्रतिनिधी | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाई नगरपालिका शाळा क्र. १ ला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबतचे निवेदन वाई तालुक्यातील अांबेडकरवादी अनुयायी अनेक संघटनांच्यावतीने मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना देण्यात आले आहे निवेदनात म्हंटले आहे की, शाळा क्रमांक १ या शाळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अनेक संघटनांच्यावतीने गेली दाेन वर्षे करण्यात आली आहे.
शाळा क्रमांक १ येते त्या प्रभागात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी राहतात. त्याचबरोबर शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वास्तूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते चाखणार तो गुरगुरणारच, असं ब्रीदवाक्य समोर ठेवून ज्यांनी या देशाचे संविधान लिहिले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव शिक्षणाचे मंदिर असणाऱ्या शाळेला देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील समस्त आंबेडकरी अनुयायींची आहे.
या गोष्टीचा सारासार विचार नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात यावा व त्यावर ठोस निर्णय घेऊन डॉ. आंबेडकर यांचे नाव शाळा क्रमांक १ ला देण्यात यावे. शाळा क्रमांक १ ला माजी खासदार व कै. लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये कै. लक्ष्मणराव तात्यांचे योगदान खूप मोठे आहे. त्याबद्दल कोणताही संशय नाही. वाई तालुक्यातील अनेक संस्थांच्या वास्तूंना लक्ष्मणराव तात्यांचे नाव देण्यात आलेले आहे.