सातारा प्रतिनिधी | कोरेगाव मतदारसंघ निवडणुकीसाठी दोन दिवसांत १ हजार ७३८ अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. केंद्राध्यक्ष तसेच विविध मतदान अधिकारी तसेच सर्वच कर्मचारी यांनी मतदानविषयक आपले कर्तव्य अचूक बजावावे. समन्वयाने काम करावे. एकमेकांमध्ये सामंजस्य ठेवावे आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यास योगदान द्यावे असे आवाहन प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांनी केले.
कोरेगाव मतदारसंघाच्या ३५४ मतदान केंद्रांसाठी मतदान प्रशिक्षण पार पडले. केंद्राध्यक्ष ४४६ आणि प्रथम मतदान अधिकारी ४०२ अशा ८४८ अधिकाऱ्यांनी आज प्रशिक्षण घेतले. दुसऱ्या दिवशी रविवारी ८९० अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. दोन दिवसात १७३८ जणांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये विविध साहित्य कसे असते, त्याचा वापर कसा करायचा विविध अहवाल कसे भरायचे तसेच प्रत्यक्ष मतदानावेळी केंद्राध्यक्ष तसेच मतदानाधिकारी यांची नेमकी जबाबदारी काय आहे याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे उपस्थित होते प्रशिक्षणाची व्यवस्था चोख करण्यात आली होती. केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी क्रमांक एक यांनी प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त करून आपल्या अडचणींचे समस्यांचे निराकरण अधिकाऱ्यांकडून करून घेतले.