साताऱ्यातील कोरेगावसह कराड दक्षिण आणि उत्तरेत मतदानाचा टक्का वाढला, फायदा कुणाचा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या साताऱ्यात मंगळवारी (७ मे) हाय व्होल्टेज लढत झाली. मतदानात कोरेगाव विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ६७.५१ टक्के मतदान झालं, तर कराड दक्षिणमध्ये ६५.६८ आणि कराड उत्तरमध्ये ६५.३३ टक्के मतदान झालंय. हा वाढलेला टक्का निकालात कोणाला फायद्याचा ठरणार, याचे आडाखे आता बांधले जात आहेत.

सातारा लोकसभा मतदार संघात १८ लाख ८९ हजार ७४० इतके मतदार होते. त्यापैकी ११ लाख ९१ हजार ८६९ मतदारांनी मतदान केलं. सहा विधानसभा मतदार संघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या कोरेगावमध्ये सर्वाधिक ६७.५१ टक्के मतदानाची नोंद झाली. त्या खालोखाल कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये ६५ टक्के मतदान झालंय. ६२.७७ टक्के मतदान झालेला सातारा चौथ्या, ६०.७८ टक्के मतदान झालेला वाई पाचव्या आणि उत्पादन शुल्क मंत्री तथा विद्यमान पालकमंत्र्यांचा पाटण मतदार संघ शेवटच्या स्थानावर राहिला आहे. पाटणमध्ये ५६.५० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

पाटण विधानसभा मतदार संघातील सरासरी मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असली तरी झालेल्या मतदानात महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. मतदान करणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. ८५ हजार ५७६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्या तुलनेत पुरुषांची संख्या ८३ हजार ६८० इतकी आहे. लोकसभा मतदार संघात महिलांचं सर्वाधिक मतदान सातारा विधानसभा मतदार संघात झालंय. १ लाख १ हजार ३१८ महिलांनी मतदानाचा हक्क बजावलाय.

पाटण विधानसभा मतदार संघ वगळता उर्वरीत पाचही विधानसभा मतदार संघात १ लाखाहून अधिक पुरुष मतदारांनी मतदान केलंय. त्यात कोरेगावने आघाडी घेतली आहे. त्या खालोखाल वाई, सातारा, कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये पुरुष मतदारांची आकडेवारी आहे. पाटण मतदार संघात ८३ हजार ६८० पुरुष मतदारांनी मतदान केलं आहे. या उलट महिला मतदारांची आकडेवारी पुरूष मतदारांपेक्षा २ हजाराने जास्त आहे.