सह्याद्री साखर कारखान्याचा वाजला बिगुल : ‘या’ दिवशी होणार मतदान

0
2096
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून गुरुवार, दि. 27 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया दि. 5 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. या निवडणुकीसाठी 5 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून निवडणुकीचा निकाल दि. 6 एप्रिल रोजी जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती सह्याद्री साखर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दि. 27 फेब्रुवारी ते 5 मार्च ही मुदत असून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जदारांची नावे रोजच्या रोज प्रसिध्द केली जाणार आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी दि. 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. वैध उमेदवारांची नावे दि. 7 मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात प्रसिध्द केली जातील. दि. 7 ते 21 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. पात्र उमेदवारांना दि. 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता निशाणी वाटप करण्यात येणार असून त्यांची अधिकृत यादीही यावेळी प्रसिध्द केली जाणार आहे.

या निवडणुकीसाठी 5 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. दि. 6 एप्रिल रोजी सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी व्यक्त उत्पादक सभासद मतदारसंघातून एकूण 16 संचालक निवडले जाणार असून यात कराड गटातून 2, तळबीड गटातून 2, उंब्रज गटातून 3, कोपर्डे हवेली गटातून 3, वाठार किरोली गटातून 3, मसूर गटातून 3 संचालकांचा समावेश आहे. अनुसूचित जाती, जमातीमधून 1, महिला राखीवमधून 2, इतर मागास प्रवर्गातून 1 आणि भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातून 1 असे एकूण 21 संचालक निवडले जाणार आहेत.