सातारा प्रतिनिधी । राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वातावरण आतापासून तयार होऊ लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम केले जात आहे. या निवडणुकीबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकाही महत्वाच्या मानल्या जात असून सातारा जिल्ह्यातील जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणार्या 133 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसेच 200 ग्रामपंचायतींमधील रिक्त 293 सदस्यपदांसाठी व 20 थेट सरपंचपदांसाठी निवडणूक होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने काल मंगळवारी रात्री निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार डिसेंबर 2023 पर्यंत मुदत संपणार्या, नव्याने स्थापित व चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्यपदासह सरपंच) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने निवडणूक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना/मतदार यादी पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींची 115 इतकी संख्या आहे.
समर्पित आयोगाचा अहवाल दिसत नसल्याने आरक्षण निश्चित करुन दिलेल्या ग्रामपंचायती 17 आहेत. तसेच मुदत संपलेल्या 133 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये 200 ग्रामपंचायतींमध्ये रिक्त राहिलेल्या 293 सदस्यपदासाठी व 20 थेट सरपंचपदाच्या अशा 313 रिक्त जागांसाठी पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी दि. 6 रोजी तहसीलदार नोटीस प्रसिध्द करणार आहेत. नामनिर्देशनपत्र दि. 16 रोजीपासून भरता येणार आहेत.
‘या’ तालुक्यातील गावामध्ये होणार निवडणूक
सातारा तालुक्यातील नित्रळ, लुमनेखोल, कोरेगाव तालुक्यातील वेलंग (शिरंबे), चोरगेवाडी, कोंबडवाडी, मुगाव, वाई तालुक्यातील विठ्ठलवाडी, महाबळेश्वर तालुक्यातील मोरणी, जावली तालुक्यातील ओखवडी, तळोशी, भोगवली तर्फ मेढा, केळघर तर्फ सोळशी, गाढवली (पुनर्वसन); फलटण तालुक्यातील सावंतवाडी व जाधवनगर; खटाव तालुक्यातील कामथी तर्फ परळी; कराड तालुक्यातील सावरघर या सर्व ग्रामपंचायतींसह पाटण तालुक्यातील विघटीत केर ग्रामपंचातीसाठी लवकरच निवडणूक होणार आहे.