कमी मतदान झालेल्या गावांमध्ये स्वीप पथकाच्या माध्यमातून केली मतदान जागृती; विधानसभेला मतदान करण्याचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण मधील 50% पेक्षा कमी मतदान झालेल्या गावांमध्ये स्वीप पथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आले. स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे, सुनील परीट, पथक कर्मचारी आनंदराव जानुगडे, संतोष डांगे, ऋषिकेश पोटे, सचिन चव्हाण यांनी कमी मतदान झालेल्या गावांमध्ये जाऊन लोकांमध्ये मतदान जागृती केली.

मतदान करणे हे आपले प्रथम कर्तव्य असून येत्या विधानसभेत आपले काम बाजूला ठेवून मतदान करावे असे आवाहन केले. कमी मतदान झालेल्या वानरवाडी, तुळसण, येवती, सवादे, म्हासोली, पाटीलवाडी या ठिकाणी स्वीप पथकाच्या माध्यमातून मतदान जागृती करण्यात आली. मतदान करण्याचे महत्त्व पटवून दिल्यानंतर या गावातील लोकांनी आम्ही जास्तीत जास्त मतदान करू असा विश्वास व्यक्त केला. ज्याप्रमाणे आपण दिवाळीचा सण साजरा करणार आहोत आणि या सणाला आपल्या गावी येतो त्याच पद्धतीने मतदान हा ही एक सण आहे.

तो उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी या उत्सवाला सर्व मतदारांनी जिथे असेल तिथून आपल्या मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे असे आवाहन स्वीपचे सहाय्यक नोडल अधिकारी सुनील परीट यांनी केले. मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करू नका, मतदान हे आपले कर्तव्य आहे ते पार पाडा असे आवाहन आनंदराव जानुगडे यांनी केले. या मतदान जागृती अभियानास गावागावातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.