सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेट ऑफ इंडिया, मुंबई येथून स्वीप कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शनिवारी सायंकाळी मुधोजी क्लब माळजाई मंदिर, फलटण येथे मतदारांना दाखविण्यात आले. प्रक्षेपणापूर्वी तहसील कार्यालयापासून फलटण शहरातील मुख्य चौकातून दुचाकी रॅली काढण्यात आली. मतदारांमध्ये मतदान जागृतीसाठी प्रशासनाकडून उपक्रम राबविण्यात आले. या वेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी मतदान करण्यासाठी शपथ दिली.
यावेळी जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, फलटणचे निवडणूक निर्णय तथा प्रांताधिकारी सचिन ढोले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती मोहीम सुरू आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनाकडून मतदान जनजागृतीचे विविध उपक्रम सुरू आहेत. त्याच अनुषंगाने एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती होण्यासाठी असे उपक्रम सुरू असल्याचे स्वीप नोडल अधिकारी सचिन जाधव यांनी सांगितले, तसेच बुधवारी २० नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले. या वेळी मतदारांनी प्रतिज्ञा घेत लोकशाही बळकट करण्यासाठी व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्याचा निर्धार केला. या वेळी मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.