‘रन फॉर वोट’ म्हणत 500 विद्यार्थ्यांकडून सायकल रॅलीद्वारे मतदान जागृती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जागृती उपक्रमांतर्गत कराड दक्षिण स्वीप, रोटरी क्लब ऑफ मलकापूर व वहागाव येथील आण्णाजी गोविंदराव पवार विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महासायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीच्या माध्यमातून वहागाव, घोणशी व परिसरातील गावांमध्ये घोषणा देत मतदान जागृती करण्यात आली.

विशेष म्हणजे या सायकल रॅलीमध्ये मुलांसह मुलींचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला. याबरोबरच वहागाव मधून मतदान जागृती रॅली काढून मतदानाची शपथ घेऊन मतदान जागृती करण्यात आली. तसेच रोटरी क्लब ऑफ मलकापूर व अण्णाजी पवार विद्यालय वहागाव यांच्या विद्यमाने ‘ रन फॉर वोट ‘ असे म्हणत वहागाव मधून मॅरेथॉन संपन्न झाली.

यावेळी रोटरी क्लबचे मलकापूरचे अध्यक्ष चंद्रशेखर दोडमणी, माजी अध्यक्ष भगवानराव मुळीक, सदस्य शिवाजीराव पाचपुते, संजय बडदरे यांच्यासह स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे, सहाय्यक नोडल अधिकारी सुनील परीट, आनंदराव जानुगडे, ऋषिकेश पोटे, संतोष डांगे, सचिन चव्हाण यांची उपस्थिती होती. विद्यालयाचे क्रीडाशिक्षक संदीप पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना मतदान जागृतीची शपथ दिली.  विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदर सायकल रॅली, मतदान रॅली व मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. मॅरेथॉन व मतदान जागृती रॅलीमध्ये विद्यालयाचे तब्बल 500 विद्यार्थी सहभागी झाले होते.