सातारा प्रतिनिधी | कोयना प्रकल्पाच्या शिवसागर जलाशयातून बामणोली येथून तेटली या ठिकाणापर्यंत बोट रॅली काढून मतदान जागृती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत दुर्गम विभागातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून विविध कार्यालयांच्यावतीने जनजागृती मतदान जागृती कार्यक्रमांतर्गत बामणोली येथे आयोजन करण्यात आले होते.
बामणोली येथे मानवी साखळीच्या माध्यमातून व बोट रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. बामणोली येथील प्राथमिक केंद्र शाळा, बामणोली शाळेतील श्रुतिका पवार, प्राथमिक शाळा पावशेवाडी शाळेतील श्रेया पवार यांनी भाषण करुन मतदान जागृती केली. बामणोलीच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील विध्यार्थ्यानी पथनाट्य सादर केले. शाळेतील मुलांनी भाषण व पथनाट्यांच्या माध्यमातून शंभर टक्के मतदान करावे अशी जन जागृती करण्यात आली.
मतदारांनी निर्भयपणे बाहेर पडून दि. २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असा संदेश देणाऱ्या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद, जावळी पंचायत समिती व अन्य शासकीय कार्यालयांच्यावतीने मानवी साखळी तयार करण्यात आली.
कोयनेच्या तिरी मतदानाची शपथ
बामणोली येथे कोयना शिवसागर जलाशयाच्या तिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत मतदानाची शपथ घेण्यात आली. मतदानाचा हक्क बजवा, चला जावूया मतदान करायला, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.