सातारा प्रतिनिधी । लोकशाही वृद्धिंगत व्हावी यासाठी मतदानाची टक्केवारी वाढायला हवी. मतदान हा आपला अधिकार असल्याने तो आपण बजावायला हवाच!” सर्वांनी मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे. असे आवाहन केंद्रप्रमुख शिवाजी साळुंखे यांनी केले.
लोणंद येथील जि प प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने नुकतीच मतदान जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी “वृद्ध असो वा तरुण सर्वजण करा मतदान, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, चला मतदान करूया – लोकशाही बळकट बनवूया,” अशा घोषणा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिल्या. फेरीदरम्यान, चिमूरड्यांनी लोणंदकरांना मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी शाळेतील सर्व मुलांनी आपापल्या पालकांनी मतदान करावे व शेजारील सर्वांनी मतदान करावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्याध्यापक अरुणा कुरपड यांनी म्हटले. यावेळी केंद्रसंचालक रोहिदास कापसे, रामदास सोळसकर, गणेश कांबळे, शोभा परदेशी, कमल बोडरे, शोभा साळुंखे, सुनिता थोरात आदी शिक्षक उपस्थित होते.