भव्य रांगोळ्या व पथनाट्यातून मतदान जागृती; कराड दक्षिणमध्ये स्वीप पथकाचा उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवूया..! सर्वांनीच मतदानाचा निर्धार करूया..!! असे म्हणत कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून कराड शहर व परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली. कराड शहरातील विविध चौकामध्ये तसेच प्रीतीसंगम घाटावर मतदान जागृतीच्या भव्य रांगोळ्या काढून लोकांमध्ये मतदान जागृती करण्यात आली. तसेच यशवंत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशवंत हायस्कूल सह आझाद चौक, चावडी चौक व बस स्थानक याठिकाणी ‘ मी मतदान करणारच ‘ हे पथनाट्य सादर करून लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

या पथनाट्याला कराड शहर व परिसरातील युवा मतदारांसह महिला मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभला. यशवंत हायस्कूलमध्ये तब्बल ३००च्या वर शिक्षक मतदारांनी हे पथनाट्य पाहून आम्ही मतदान करणारच अशी प्रतिज्ञा केली. याबरोबरच बस स्थानक, आझाद चौक या ठिकाणीही सादर करण्यात आलेल्या मतदान जागृती पथनाट्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याबरोबरच कराड शहरातील विविध चौकात तसेच बसस्थानक व प्रीतीसंगम घाटावर साकारण्यात आलेल्या मतदान जागृतीच्या भव्य रांगोळ्या पाहण्यासाठीही मतदारांनी गर्दी केली होती.

सदर मतदान जागृती उपक्रम यशस्वी करण्यासाठी कराड दक्षिण स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे, सहाय्यक नोडल अधिकारी सुनील परीट, आनंदराव जानुगडे, ऋषिकेश पोटे, संतोष डांगे, सचिन चव्हाण यांनी परिश्रम घेतले. या मतदान जागृती उपक्रमाला यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक महामुलकर, यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले. यावेळी डायटचे विजय भिसे, शैला भिसे यांच्यासह डायटचे तज्ञ मार्गदर्शक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.