“उठ मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो…”; पथनाट्यातून कराडच्या विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडत आहे. भारतीय निवडणूक आयोग निर्भय,मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणुका घेण्यासाठी कटिबद्ध आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, भारतीय लोकशाही बळकट व्हावी यासाठी प्रयत्नशील असते. यासाठी मतदार जनजागृतीचे उपक्रम (SVEEP)उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय निवडणूक आयोग करीत असतो. याचाच एक भाग म्हणून यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजममधील नवमतदारांनी पटनाट्यातून मतदान जनजागृती केली.

यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराडच्या विद्यार्थ्यांनी ‘मतदार राजा जागा हो’ पथनाट्यातून मतदान करण्याचा, कोणत्याही तत्कालीक आमिषाला बळी न पडता,जात धर्म,वंश,पंथ न पाहता योग्य लोकप्रतिनिधी निवडण्याचा संदेश आपल्या पथनाट्यातून दिला आहे. हे पथनाट्य समाज माध्यमावर खूपच व्हायरल होऊ लागले आहे.सर्वसामान्य नागरिकांना आपल्या मताधिकाराची जाणीव,त्याचे लोकशाहीतील महत्त्व, सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा त्याचा परिणाम, नागरिकांना शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगाराच्या संधी, नवीन तंत्रज्ञान, कायदा व सुव्यवस्था, सुख, समाधान, शांतता, सामाजिक सलोखा इत्यादी केवळ योग्य लोकप्रतिनिधीच निवडून मिळू शकतात याची जाणीव या पथनाट्यातून होत आहे.

घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकास भारतीय लोकशाहीची फळे चाखावयास मिळाली पाहिजेत, प्रत्येक घटकाचे कल्याण झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती केवळ आपण आपल्या एका सजग मतदानातूनच पूर्ण करू शकतो असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराडचे प्राचार्य डॉ .सूर्यकांत केंगार यांनी केले आहे.

पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. सुषमा कीर्तने यांनी केले आहे तर चित्रीकरण व संकलन विद्यार्थी ऋतुराज वीर यांने केले आहे.विद्यार्थी दर्शना कुंभार,ऋतुराज वीर,श्रेयश स्वामी,सुजित सुतार,सौरभ रोकडे, सुरज यादव प्रशांत फसाले, अभिषेक गुरव मोनीश कुंभार व अवधूत पाटील यांनी पथनाट्यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.