सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आरोप- प्रत्यारोपांनी हळूहळू वातावरण गरम होऊ लागले आहे. सोशल मीडियावर तर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल वॉर सुरू झाले आहे. व्हॉट्सअॅप, उजाडल्यापासूनच फेसबूकवर एकमेकांविरोधात पोस्ट करून एकमेकांची उणी दुणी काढली जात आहेत. उमेदवार या सर्व गोष्टींपासून दूर असले, तरी समर्थकांमध्ये मात्र आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे.
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत चुरशीची लढत होणार आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्येच खरी लढत होणार आहे. मात्र, वाई आणि फलटण विधानसभा मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान महायुती व महाविकास – आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसमोर आहे.
आता प्रचाराचा धुरळा
जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत तोडीचे आणि मुरब्बी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे येथील हेवीवेट लढतींकडे राज्याचेसुद्धा लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सोमवारी आटोपल्यानंतर मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. पुढील १३ दिवस प्रचाराचा धुरळा उडणार आहे, पण सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा उडविण्यास गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरुवात झाली आहे.
निवडणूक पंधरा दिवसांची, वैर मात्र आयुष्यभरासाठी!
राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. एकमेकांवर टीका-टिप्पणी करणारे नेते काही वेळाने एकत्र येऊन गप्पा मारतात. पण, उमेदवारांचे समर्थक आणि विरोधक मात्र आपसात वाद करून वैर ओढवून घेत आहेत. निवडणूक पंधरा दिवसांची मात्र वैर आयुष्यभरासाठी, असे चित्र पाहायला मिळत आहे.
चित्र निकालाच्याच दिवशी स्पष्ट होणार
आपलाच उमेदवार कसा सरस आहे आणि विरोधी उमेदवार कसा आणि कमजोर आहे हे सांगण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहे. विरोधकांकडून त्याला तोडीस तोड प्रत्त्युतर दिले जात आहे. या प्रचाराचा परिणाम मतदार राजावर किती प्रमाणात झाला आहे हे निवडणूक निकालाच्याच दिवशी स्पष्ट होणार आहे.