कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून कराड येथील तहसील कचेरीत सर्व मतदार तसेच तहसील कर्मचाऱ्यांची मतदार शपथ घेण्यात आली. मतदान जनजागृती अंतर्गत यावेळी जनजागृती रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.
स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे यांनी यावेळी मतदानाचा करू निर्धार, लोकशाहीला देऊ आधार या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी या विधानसभा निवडणुकीत मतदान करून लोकशाही बळकट करूया असे आवाहन केले. सचिन चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपण ज्याप्रमाणे सण उत्सव साजरे करतो त्याचप्रमाणे लोकशाहीचा हा निवडणुकीचा उत्सव सर्वांनी साजरा करून उत्स्फूर्त मतदान करूया असे आवाहन सहाय्यक नोडल अधिकारी सुनील परीट यांनी केले. यावेळी मतदार शपथ घेण्यात आली. तसेच उपक्रमात सहभागी मतदारांनी आम्ही मतदान करणारच असा निर्धार केला.
ऋषिकेश पोटे यांनी आभार मानले. यावेळी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मतदान जागृती संदर्भात विविध घोषणा देत रॅली कराडमधून काढण्यात आली. या उपक्रमात स्वीप पथकाचे अधिकारी, कर्मचारी, तहसील कचेरीतील सर्व अधिकारी, कर्मचारी, पंचायत समितीमधील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.