कराड प्रतिनिधी | नव्या वर्षात सुरुवातीलाच ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. कराड तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या आणि प्रभाग निहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये कराड दक्षिण मधील १६ तर उत्तर मधील १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार आहे.
ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार
तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेने बाबरमाची, जुजारवाड़ी, कालेटेक, कोळेवाडी, कोरीवळे, मुनावळे, नडशी, शिंगणवाडी, तुळसण, वनवासमाची (स.गड), विठोबाचीवाडी, पाचुपतेवाडी, नारायणवाडी,, मसूर, राजमाची, पवारवाडी (नां), वडोली भिकेश्वर, वाण्याचीवाडी, धनकवडी, कचरेवाडी, माळवाडी, यादववाडी, संजयनगर (काले), मेरवेवाडी, कोर्टी, लोहारवाडी, कापील, डिचोली या ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
आरक्षणावरील हरकतीसाठी शुक्रवारी अंतिम मुदत
28 ग्रामपंचायतींच्या प्रभाग निहाय आरक्षण सोडतीसाठी 9 फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करून आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे. आरक्षण निश्चितीबाबत हरकती आणि सूचना दाखल करण्यास 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. हरकती , सूचना दाखल करण्याचा उद्या (शुक्रवार) शेवटचा दिवस आहे. 23 फेब्रुवारी रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने 14 फेब्रुवारी रोजी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी 20 फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे. 23 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे 28 गावांमध्ये सध्या निवडणूक पूर्व रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या निवडणुकांमुळे ऐन उन्हाळ्यात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे.