सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्हा स्वीप कक्षा मार्फत जिल्ह्यात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातारा लाेकसभा मतदारसंघात 7 मे राेजी 100 टक्के मतदान करा, अशा पद्धतीच्या फलकांतून जागृती करण्यात आली.
विशेष म्हणजे या रॅलीमध्ये ई-बाईकचा तसेच हेल्मेटचा वापर करण्यात आला. रॅलीच्या सुरुवातीला मतदान जनजागृतीची शपथ देण्यात आली. रॅलीमध्ये 700 ते 800 दुचाकी वाहनांचा समावेश होता. ही रॅली सातारा जिल्हा परिषद मैदानातून पोवई नाका मार्गे मोळाचा वाडा ,वर्ये, नेले, किडगाव, कळंबे, माळ्याची वाडी, साबळेवाडी कोंडवे मार्गे सातारा परत आली.
या रॅलीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा परिषद प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्यासह प्रशासकीय प्रमुख अधिकारी बाईकवरुन सहभागी झाले होते.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन निलेश घुले, कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अर्चना वाघमळे, पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे, शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मूजावर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक प्रभावती कोळेकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,महिला व बालकल्याण रोहिणी ढवळे, गटविकास अधिकारी पंचायत समिती सतीश बुद्धे उपस्थित होते.