तासवडे टोल नाक्यावर मतदार जागृतीचा संकल्प; कराड उत्तर मतदारसंघात स्वीप पथकाकडून उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात स्वीप पथकाकडून मतदान जागृतीसाठी राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोल नाक्यावर उपक्रम राबविला. यामध्ये मतदानाची २० नोव्हेंबर तारीख विसरायची नाही, त्या दिवशी मतदान करणारच, असा संकल्प प्रत्येकाने करून राष्ट्रीय कर्तव्य बजवावे, असे आवाहन केले आहे.

पथकाकडून प्रवासी, फेरीवाले, वाहन चालक व छोट्या व्यापाऱ्यांमध्ये जागृती करण्यात आली आहे. वृद्ध असो वा जवान सर्वांनी करावे मतदान, सोडा सर्व काम चला करू मतदान, आद्यकर्तव्य भारतीयांचे पवित्र कार्य मतदानाचे, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, आपले मतदान आपले भविष्य आदी विविध घोषणा सर्वांनी दिल्या.

प्रजासत्ताक देशाचे नागरिक आहोत, प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, योग्य लोकप्रतिनिधी निवडून देशाला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व उभे करावे, प्रजासत्ताक देशाच्या विकासाची सुरुवात मतदानातूनच होते म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे प्रतिपादन स्वीप पथकाचे सहायक प्रमुख डॉ. महेंद्र भोसले यांनी केले.

उपक्रमास स्वीप पथकाच्या मध्यवर्ती अधिकारी प्रतिभा लोंढे, त्यांचे सहकारी गोविंद पवार, अनिल काटकर, प्रदीप बंडगर, काजल कुंभार तासवडे पथकर नाक्याचे मुख्य व्यवस्थापक नरेंद्र लिबे, महेश कोळी, नीलेश भोसले, प्रकाश पवार उपस्थित होते.