सातारा प्रतिनिधी | झाडाणी गाव पुनर्वसित आहे. गावात एकही वस्ती नाही. तरीही वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आमदारपदाचा गैरवापर करुन वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दबावाखाली झाडाणी येथे वीजट्रान्स्फर आणि वीजजोडणी करण्यास लावली. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील ५१ लाखांचा निधी वापरण्यात आला. त्यामुळे आमदार पाटील जननायक नसून लाभदायक आहेत, असा गंभीर आरोप युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
सातारा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई उपस्थित होते. विराज शिंदे म्हणाले, महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावातील लोक रायगड जिल्ह्यात पुनवर्सित झाले आहेत. गावात एकही मानवीवस्ती नाही. या गावात मोठ्या अधिकाऱ्यांनी आणि राजकीय लोकांनी जमिनी घेतल्यात. चंद्रकांत वळवी या अधिकाऱ्याचीही जमीन असल्याचे समजते. तसेच सालोशी येथील वळवी व सावे वस्ती येथे आदित्य चंद्रकांत वळवी यांनी सुमारे ४० एकरात अनाधिकृतरित्या रिसाॅर्टचे बांधकाम करुन अनेक झाडांची कत्तल केली.
https://www.facebook.com/share/v/ki6Ag2MBj4wJQEya/?mibextid=qi2Omg
कोणत्याही प्रकारची राॅयल्टी न भरता मोठ्या प्रमाणात उत्खननही करण्यात आले आहे. या ठिकाणी रिसाॅर्टचे बेकायदेशीर बांधकाम करताना वीजपुरवठा करण्यात आला. यासाठी जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातून निधी उपलब्ध होण्यासाठी वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना शिफारस पत्र दिले होते. त्यानुसारच हा वीजपुरवठा करण्यात आला. आजही तेथे वळवीवस्ती अस्तित्वात नाही. मात्र, आमदार पाटील यांनी पदाचा गैरवापर करुन अधिकाऱ्यांवर दबाव आणला. त्यानंतरच रिसाॅर्टला वीजपुरवठा उपलब्ध झाला.
वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे पाटील यांच्यावर फाैजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे. अन्यथा उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करणार आहे, असा इशाराही विराज शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत दिला आहे.