सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी व रणनीतीसंदर्भात अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य व कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव तालुका काँग्रेस समितीची सभा नुकतीच पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. तशा प्रकारचे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळत असल्याचे महत्वाचे विधान माजी मंत्री विनयकुमार सोरके यांनी केले.
यावेळी कोरेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्रीकांत चव्हाण, राजेंद्र शेलार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव, जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष जगन्नाथ कुंभार, मनोहर बर्गे, आनंद जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी सोरके म्हणाले की, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे संभाव्य उमेदवार हे फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देत असून, ही बाब चुकीची व महाविकास आघाडीत तणाव निर्माण करणारी आहे. याचे दुष्परिणाम होतील. वास्तविक, निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, असे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळत आहेत. अशावेळी निवडणुकीवर परिणाम होईल, असे काही संबंधितांनी करू नये, अन्यथा त्याची वरिष्ठ पातळीवर तक्रार करावी लागेल, असा इशारा सोरके यांनी यावेळी दिला.