मसूरसह हेळगावात चिकुनगुनियासदृश आजाराने ग्रामस्थ त्रस्त; आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील मसूर व हेळगावसह परिसरात चिकुन गुनियासदृश आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. सध्या अंग दुखणे, डोके दुखणे, हाडांचे सांधे दुखणे, पायांची बोटे व हातांची बोटे दुखणे, थंडीताप व तोंडाला कोरड पडणे आणि चालायलाही न येणे अशी परिस्थिती अनेक जणांची झाली आहे. चिकुनगुनिया व डेंग्यू सदृश रुग्ण परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे हेळगाव, मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राने जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी आघाडी घेतली आहे.

परिस्थितीनुसार काही रुग्ण सरकारी दवाखान्याचा आधार घेत आहेत. काही रुग्णांनी खासगी दवाखान्याचा रस्ता धरला आहे. घरातील एका व्यक्तीला सुरुवात झाली की त्यास औषध उपचार करेपर्यंत दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या व्यक्तीला संबंधित लक्षणे सुरू होऊन त्रास होत आहे.

नेमके कोणत्या डॉक्टरांकडे गेले पाहिजे याबाबत लोक संभ्रमात आहेत. गुण येतो अशा डॉक्टराकडे तोंडी प्रचारातून अनेक लोक जात आहेत. तोंडी झालेल्या प्रचारातून बाहेर अनेकजण वेगवेगळ्या दवाखान्यातून उपचार घेत आहेत. मसूर-हेळगाव परिसरातील बहुतांशी कुटुंबे अजूनही या आजाराने त्रस्त आहेत.