कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील विंग गावातील गायरान जागेत सुरू असलेल्या मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प बांधकाम ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असून त्यांनी गुरुवारी सुरु असणाराने काम बंद पाडले. यावेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत कामाचा निषेध व्यक्त केला. गावच्या विकासाचे निर्णय त्या जागेत झाले असून, गावकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू केलेले प्रकल्प बांधकाम रद्द करावे, प्रकल्पाविरोधात न्यायप्रविष्ट कार्यवाही सुरू आहे.तोवर काम बंद ठेवावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा गावकऱ्यांनी बांधकाम कर्मचाऱ्यांना दिला.
यावेळी सरपंच शुभांगी खबाले यांनी दिला. तंटामुक्ती अध्यक्ष संपत खबाले, बाबूराव खबाले, संतोष कासार-पाटील, शिवाजी पाटील, जयवंत खबाले, अमोल पाटील, संदीप माळी, बाबू पाटील, बापूराव खबाले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विंग येथील गायरान जागेत प्रकल्प उभारणीचे बांधकाम सुरू केले आहे. तब्बल १० एकरात प्रकल्प उभारणीला प्रारंभ झाला आहे.
संबंधित ठेकेदार कंपनीकडून तेथे सामग्री आणली आहे. जेसीबीच्या साहाय्याने बांधकाम उभारणीचे काम सुरू आहे. जागा सपाटीकरण करून खड्ड्यांचे खोदकाम केले आहे. माहिती मिळताच ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली. बांधकामाला विरोध दर्शवत काम बंद पाडले. प्रकल्प उभारणीस विरोध असून, त्या जागेत गावच्या विकासाचे महत्त्वाचे निर्णय ग्रामसभेत झाले आहेत. त्यातच प्रधानमंत्री आवास योजनेतून दारिद्र्यरेषेखालील १५६ घरकुल मंजूर लाभार्थ्यांच्या जागेचा प्रश्न आहे.
घरकुल लाभार्थ्यांना त्याठिकाणी जागा देण्याचा विचार आहे. सुमारे नऊ हजार लोकवस्तीचे गाव आहे. आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीचे प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. क्रीडा संकुलाचा विषय आहे. तेथे प्रकल्प उभारणीला विरोध असून, आम्ही न्यायालयात गेलो आहोत, तो निर्णय प्रलंबित आहे. शासन व न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत काम बंद ठेवावे, असे मत ग्रामस्थानी व्यक्त केले.