सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील व्याहळी पुनर्वसन क्षेत्रातील डोंगर पायथ्याशी सुरू असलेल्या धोकादायक उत्खननामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या जीवावर घाला आहे. हे उत्खनन वैराटगडाच्या पायथ्याशी सुरू आहे, ज्यामुळे अतिवृष्टी किंवा भूस्खलनाच्या घटनेमध्ये येथील कायमस्वरूपी राहणार्या 15 ते 20 कुटुंबांना जीवित आणि वित्तहानीचा धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीत ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे निवेदन देऊन हे उत्खनन थांबवण्याची मागणी केली आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, व्याहळी पुनर्वसन येथील डोंगर पायथ्याशी धोकादायक उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी 15 ते 20 कुटुंबे कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. व्याहळी पुनर्वसन हद्दीमध्ये येणार्या मालुसरेवाडी, व्याजवाडी, कडेगाव, व्याहळी आणि शेलारवाडी या गावांतील नागरिकांनी या धोकादायक उत्खननाविरुद्ध आम्ही आवाज उठवत आहोत. शासनाने या परिसरातील अनेक खाणी बंद केल्या असताना, व्याहळी पुनर्वसन क्षेत्रात नियम पायदळी तुडवून हे उत्खनन सुरू आहे, यावर तातडीची कारवाई करून या खाणी बंद करण्याची मागणी केली जात आहे.
अतिवृष्टी किंवा भूस्खलनामुळे भविष्यात या कुटुंबाला जीवित किंवा वित्तहानीचा धोका आहे. तसेच वाई बाजूकडूनही वैराटगडावर जाण्यासाठी या बाजूचा उपयोग ग्रामस्थ व पर्यटक करतात. एकीकडे शासन गड संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी वाई तालुक्यातील कित्येक खाणी शासनाने बंद केल्या आहेत. परंतु, सर्व नियम पायदळी तुडवून व्याहळी पुनर्वसन हद्दीत धोकादायक उत्खनन सुरू आहे.