संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी अर्धनग्न होत केलं आंदोलन; नेमकी मागणी काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील केसुर्डी ग्रामस्थांच्या वतीने नुकतेच अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. संबंधित कंपन्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी महत्वाची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या या अर्धनग्न आंदोलनाची चर्चा संपूर्ण जिल्हाभर सुरु आहे.

केसुर्डी येथील एमआयडीसीमधील इलजिन ग्लोबल इंडिया कंपनी व ओरीयंटल इस्ट कंपनी यांच्याकडून केमिकलयुक्त राख व लिक्वीड यांची अवैधरित्या विल्हेवाट लावली जात आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर धुराड्यामधून धुर बाहेर फेकला जातो. यामुळे केसुर्डी ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत कारवाईची मागणी देखील ग्रामस्थांनी संबंधित उप-प्रादेशिक कायर्यालय म.प्र.नि. मंडळाकडे केली होती. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. याच कारणावरून केसुर्डी ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन करत कंपनीचा निषेध व्यक्त केला.

या कंपन्यांच्या माध्यमातून शासनाच्या निकषांची पायमल्ली केली जात असून या कंपन्यांमुळे केसुर्डी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेती, पाणी नापिक होऊन भविष्यातील पिढ्या उदनिर्वाहाच्या साधनांपासून वंचित राहणार आहे. कंपन्यांवर १५ जानेवारी २०२४ पर्यंत योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु, संबंधित कंपन्यांवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे अखेर आज केसुर्डी MIDC येथील ओरीयंटल इस्ट कंपनी येथून खंडाळा तहसीलदार व तेथून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्व ग्रामस्थांनी अर्धनग्न मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे केसुर्डी ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले.