सातारा प्रतिनिधी | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिषेक घालून विशिष्ट समाजाच्या मंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण केली जात आहे. हे निंदनीय कृत्य करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी. अन्यथा फुले अनुयायी राज्यभर उग्र आंदोलन करतील, असा इशारा नायगाव ग्रामस्थांनी दिला.
नायगाव येथे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री सावित्रीबाई फुले स्मारकास अभिवादन करून सभास्थळी कार्यक्रम सुरु असताना काही लोकांनी छगन भुजबळ आणि रुपालीताई चाकणकर यांचा निषेध करीत स्मारकास अभिषेक केला. मात्र या समाजकंटकांना सावित्रीबाई फुले कधी कळाल्याच नाही. मुळातच नायगावचा कार्यक्रम सामाजिक जडणघडण करणारा आहे. ते राजकीय व्यासपीठ नाही. स्मारकाच्या ठिकाणी असे कृत्य करून त्यांनी महापुरुषांची विटंबना केली आहे. पक्षीय राजकारण करीत येथे जातीय तेढ निर्माण केली गेली. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी. सावित्रीबाई फुले स्मारका समोर नायगाव ग्रामस्थ फुले अनुयायांनी मोठ्या संख्येने एकत्र येवून भूमिका मांडली.
फुले दाम्पत्यांच्या विचारधारेवर हे राज्य मार्गक्रमण करीत आहे. भाजपासोबत काही लोक गेले असतील तर तो त्यांचा राजकीय भाग आहे. कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री आणि आमदार भाजपासोबत गेलेले होते. मग केवळ भुजबळ आणि चाकणकर यांचेच यांना वावडे का ? असा प्रश्न उपस्थित करीत हा केवळ जातीय संघर्ष निर्माण करण्यासाठी काही तरुणांनी केलेले कृत्य आहे. प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याची धमक फुले अनुयायी यांच्यामध्ये आहे असा गंभीर इशारा नायगाव ग्रामस्थ , सरपंच , उपसरपंच , उत्सव कमिटी व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी दिला.