“आता जीव गेल्यावर आमचं पुनर्वसन करू नका”; ‘या’ गावातील संतापलेल्या ग्रामस्थांची प्रशासनाकडे विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिम‌ भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. या पावसामुळे सातारा तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडून काही भाग खचला आहे. यामुळे या गावातील ग्रामस्थांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली असून आमचा जीव गेल्यावर पुनर्वसन करू नका,” अशी विनंती प्रशासनाकडे संतापलेल्या मोरेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

सातारा तालुक्यातील पश्चिमेच्या बाजूस तारळी धरणाच्या अगदी जवळ असणाऱ्या मोरेवाडी गावालगत असणाऱ्या डोंगरालाच मोठ्याला भेगा पडल्या आहेत. डोंगराला भेगा पडल्यामुळे या ठिकाणीचे भले मोठे दगडदेखील अनेक फूट पुढे सरकले आहेत. नेहमी या ठिकाणी येणाऱ्या लोकांनी हे पाहिल्यानंतर गावात भितीचं वातावरण पसरले आहे. मोरेवाडी गावातील ग्रामस्थांना शेल्टरमध्ये हलवले असले तरी प्रत्येक पावसाळ्यात मृत्यू त्यांच्या डोक्यावर काळ बनून बसलेला आहे.

रायगड येथील इर्शाळवाडीमध्ये घडलेल्या दुर्घटनेला सामोरं जाण्याआधी आमचं कायमचं पुनर्वसन करावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे ४१ गावं दरडप्रवण क्षेत्रात येतात. त्यातीलच मोरेवाडी हे गाव आहे. इर्शालवाडी घटनेनंतर सातारा जिल्हा प्रशासन अलर्ट झालं असलं तरी मोरेवाडीतील ग्रामस्थ भयभीत आहेत. मात्र, या ग्रामस्थांचे कायमस्वरुपी पुनर्वसन कधी होणार? हे आता पहावे लागणार आहे.