सातारा प्रतिनिधी | झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील वडिलोपार्जित जमिनी बळकवणाऱ्या अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी याच्यावर गुन्हा दाखल करून जमिनी परत कराव्यात, अन्यथा दि. १० जूनपासून माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्यासमवेत उपोषणास बसणार असल्याचा इशारा झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही खोपोली (जि.रायगड) येथे १९८० सालापासून स्थलांतरीत आहेत. १९६० साली कोयना धरणासाठी कोयना, कांदाटी या भागातील गावांचे पुनर्वसन झाले. त्यावेळी आमच्या झाडाणी गावालाही नोटीस बजावली होती. आमचे गाव शेवटच्या टोकाला आहे. डोंगरावर असल्याने दळणवळण नव्हते. पुनर्वसन झाल्यावर आम्हाला शासनाचा कोणताही मोबदला मिळाला नाही.
झाडाणी गाव हे अतिदुर्गम भागात असल्याने दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. अति पाऊस आणि हिंस्र श्वापदांच्या त्रासामुळे नाईलाजास्तव घरदार व जमीनजुमला सोडून मुलाबाळांसह पोट भरण्यासाठी रायगड जिल्ह्यात घरापुरती जमीन घेऊन मोलमजुरी करून जीवन जगत आहोत. आम्ही आमची जमीन सोडून आल्याची माहिती मिळताच मि स्थानिक दलालांनी नवीन वस्तीचा पत्ता शोधून ग्रामस्थांना जमीन विकता का? असे विचारल्यानंतर ग्रामस्थांनी जमीन विकण्यास नकार दिला. त्यानंतर एजटांनी जर तुम्ही जमीन विकली ~ नाही तर ती जमीन शासन जमा होईल. त्यापेक्षा ती जमीन विकून त्या जमिनीचा मोबदला घ्या, अशी भीतीं ग्रामस्थांच्या मनात निर्माण केली.
काही ग्रामस्थ जमीन विकण्यासाठी तयार झाले. त्यांनी त्या एजंटसमोर आमच्या नावावर काही जमीन शिल्लक राहिली पाहिजे. शिल्लक जागेमध्ये जाण्या- येण्यासाठी रस्ता असावा, आमचे गावठाण आमचे नावे असावे, अशा अटी ठेवल्या. परंतु अशिक्षित ग्रामस्थांची दिशाभूल करून फसवणूक करण्यात आली. ही जमीन चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे करण्यात आली. ज्या ग्रामस्थांचा विरोध होता त्या ग्रामस्थांना वकिलामार्फत खोट्या नोटीसी पाठवून जमीन विकण्यास भाग पाडल्याचा आरोपही निवेदनात केला आहे.
चंद्रकांत वळवी आणि त्यांचे कुटुंबीय दांडगाईने आम्हाला आमच्या जागेमध्ये तसेच ग्रामदैवत लव्हेश्वर मंदिरात जाउ देत नाहीत. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ग्रामस्थांना फसवून या वहिवाटी रस्त्यावर जाण्या- येण्यास बंदी घातली आहे. आम्ही चंद्रकांत वळवी यांची अनेकवेळा भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी अनेक वेळा संपर्क करून त्यांनी आमच्याशी एकदाही संपर्क केला नाही किंवा उत्तरही दिले नाही. एजंटने पॉवर ऑफ ऑटर्नी करून संपूर्ण जमीन हडपून ग्रामस्थांची फसवणूक केली आहे.या प्रकाराची योग्य ती चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा. एजंटने आमच्याकडून काही कागदपत्रांवर रायगडला येऊन सहया व अंगठे घेतले आहेत.
मयत व्यक्तींच्या नावे देखील खरेदीपत्र करण्यात आले आहे. यामुळे दुय्यम निबंधक, एजंट, दस्त लेखनिक, दस्तऐवजाची नोंद करणारे तत्कालीन तलाठी, सर्कल, तहसिलदारांची खातेनिहाय तसेच एसआयटीमार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी झाडाणी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे. या निवेदनावर खातेदार आणि त्यांच्या ५० वारसदारांच्या सह्या आहेत.