सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील महत्वाच्या अशा औंधसह 16 गावांच्या शेती पाणी प्रश्नी मागील आठ दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे यांच्याकडून उपोषण सुरू असून रविवारी शासनाच्या वेळकाढूपणा व दुर्लक्षाबाबत औंधसह सोळा गावातील आर्थिक व्यवहार व दुकाने बंद ठेऊन तसेच औंध येथे मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी औंध गावातून भव्य निषेध रॅली काढण्यात आली. शासनाच्या मनमानी व वेळकाढूपणाबद्दल शेतकरी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही रॅली औंध गावातील ग्रामपंचायत चौक, हायस्कूल चौक, होळीचा टेक, केदार चौक, मारुती मंदिर मार्गे जुने एसटी स्टँडवर आणण्यात आली.
शासनाने त्वरित या योजनेस प्रशासकीय मान्यता द्यावी तसेच आचारसंहिते अगोदर योग्य ती कारवाई व्हावी, मागील तेरा वर्षापासून आपण हा संघर्ष सुरू ठेवला आहे. सोळा गावातील जनतेचा अंत शासनाने पाहू नये तसेच शासन जोपर्यंत योग्य न्याय देत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असा इशारा जगदाळे यांनी दिला.
यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ शेतकरी युवक विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा उरमोडी विभागाचे उपअभियंता अविनाश जाधव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन दत्तात्रय जगदाळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रशांत जाधव, वसंत पवार, प्रशांत कुंभार ,सर्जेराव जाधव यांनी जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केली व त्वरित हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली.