संत-महंतांची ही भूमी मद्यासुरांची करायची आहे का?: विलासबाबा जवळ यांचा मद्य धोरणावरून मंत्री अजितदादांना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मागील उत्पादन शुल्कमंत्र्यांनी ग्रामपंचायतीच्या ना हरकत दाखल्याशिवाय दारूच्या दुकानांची खैरात वाटली. आता नवीन उत्पादन शुल्कमंत्री अजित पवार यांनी मद्याची दुकाने वाढविण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश म्हणजे संत-महंतांची ही भूमी मद्यासुरांची करायची आहे का? असा सवाल करून व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन करण्याऐवजी दारूला प्रतिष्ठा देण्याचे काम हे सरकार व त्यांचे मंत्री करत आहेत, अशी टीका राज्य व्यसनमुक्त युवक संघाचे राज्य प्रवक्ते विलास जवळ यांनी केली.

संदर्भात विलासबाबा जवळ यांनी ‘हॅलो महाराष्ट्र शी’ संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अगोदरच दारूमुळे अनेकांची कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली असताना राष्ट्रपिता महात्मा गांधींनी नशाबंदी आवश्यक म्हटले होते. मात्र, स्वातंत्र्योत्तर काळात त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन अधिकाधिक दारू दुकानांना सरकारने परवानगी देत महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र केले आहे.

या आधीच्या उत्पादन शुल्कमंत्र्यांनी, तर कहरच करत ग्रामपंचायतीच्या ना हरकत दाखल्याशिवाय शेकडो दारू दुकानांची खैरात वाटली आहे. त्यात भर म्हणून आता नवीन उत्पादन शुल्कमंत्री अजित पवार यांनी मद्याची दुकाने वाढविण्यासाठी दिलेला आदेश म्हणजे संत-महंतांची ही भूमी मद्यासुरांची करायची आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

राज्याचे आर्थिक धोरण नशिले पदार्थांच्या करावर आधारित असेल, तर ते राज्य कदाचित श्रीमंत व सुखी होणार नाही. सरकारच्या या धोरणामागे तीन फायदे असून, एक दारूचा खप वाढवून तिजोरीत जादाचे पैसे आणणे. दुसरे हे लाडक्या बहिणींचे पती दारूच्या नशेत बहिणींना जिवे मारतील. जेणेकरून लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होईल.

तिसरा युवकांना दारूच्या नशेत ढकलून कुठल्या तरी गुन्ह्यात अडकून रोजगार मागण्यास अपात्र करणे. कारण राज्यातील ही दारूची दुकाने नेते व त्यांच्या बगलबच्च्यांची आहेत. मुळात शाळा- महाविद्यालयांच्या स्तरावर व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन करून त्यांच्या मनावर बिंबवायला हवेत होते. तसे न होता दारूला प्रतिष्ठा देण्याचे काम सरकार व त्यांचे मंत्री करत असतील तर ते दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विचार करून महाराष्ट्राचे मद्य धोरण व व्यसनमुक्तीचे धोरण एकदा ठरवावे. आम्ही व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून गुरूवर्य बंडातात्या कराडकर यांच्यासोबत लवकरच त्यांची भेट घेऊन चर्चा करू, असे जवळ यांनी यावेळी सांगितले आहे.