सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यात होणाऱ्या अवैध दारूविक्रीच्या आडून तालुक्यात मान्यताप्राप्त दारू दुकाने सुरू व्हावेत, असा खटाटोप करणाऱ्यांचीच भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे त्यांनी गाव तिथे परमीट रूम व बार सुरू करून पुरस्कार मिळवावे, अशी खरमरीत टीका जावळी तालुका व्यसनमुक्ती संघटनेचे संघटक विलास जवळ यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
जावळी तालुका १६ वर्षांपूर्वी दारूबंदीच्या एका वैशिष्ट्यपूर्ण महिलांच्या लढ्याने चर्चेत आला. महिलांच्या विचारातील परिवर्तनाने क्रांती झाली आणि सहा गावांतून १३ दारूची दुकाने महिलांच्या मतदानाने बाटली आडवी करून बंद झाली. त्याकाळी प्रस्थापित पुढाऱ्यांच्या बगलबच्चांची दारू दुकाने बंद होणार म्हणून त्यावेळीही अनेकांनी याला विरोध केला होता. आता अशीच काही मंडळी एकत्र येत असून, जावळी तालुक्यातील अवैध दारू बंद होत नाही, मग वैध दारू दुकानांना परवानगी द्या, अशी मागणी करीत आहेत.
यापुढे आमचाच आवाज चालणार, आम्ही इथे एकही दारू व मटका अड्डा चालू देणार नाही, अशी गर्जना काही वर्षांपूर्वी अड्ड्यावर जाऊन तथाकथित नेत्याने केली; पण एका कारवाईनेच ती हवेत का बरे विरली? सत्तेच्या केंद्रस्थानी राहूनही आपल्या गावातील अवैध व्यवसाय का बंद केले नाहीत? यामागचे गौडबंगाल काय? अवैध दारू विक्रेत्यांना धमकावून कोणत्या ढाब्यावर किती बाटल्या रिचविल्या, याच्या करामती कॅमेऱ्यात कैद आहेत. हागणदारी मुक्त गावे करण्यासाठी शौचालये बांधली, तरीही लोकं रस्त्याच्या कडेला बसतात म्हणून शौचालये पाडायची का?
गतिरोधक व मार्गदर्शक फलक बसविले, तरी अपघात थांबत नाहीत म्हणून गतिरोधक व सूचना फलक काढून टाकायचे का? असे सवालही पत्रकात करण्यात आले आहेत. संशयास्पद भूमिका घेऊन चळवळीला समाजात बदनाम करण्यापेक्षा आपल्याकडे सत्तास्थाने आहेत, आपण पोलिस अधीक्षक यांनाही भेटायला जाणार आहात, तर तथाकथित समाज सेवकांच्या मालमत्तेची, उत्पन्नाची व कर्जाचीही चौकशी करायला सांगा म्हणजे सत्य जनतेसमोर येईल असे जवळ यांनी म्हंटलं आहे.
दारूबंदी करून पुरस्कार मिळविले… : विलासबाबा जवळ
याबाबात ‘हॅलो महाराष्ट्र‘ने विलासबाबा जवळ यांच्याशी संवाद साधला. यावेळी जवळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, दारूबंदी करून पुरस्कार मिळविले, असे आपल्याला वाटत असेल तर आता आपणही जनतेची काळजी घ्या. जावळी तालुक्यातील गाव तिथे परमीट रूम बार सुरू करा, म्हणजे लोकांना मुबलक व स्वस्त दारूही मिळेल. या गावातून त्या गावात जाताना लोकांचे अपघातही होणार नाहीत. लाडक्या बहिणींचे संसारही उद्ध्वस्त होणार नाहीत. ज्यांची घरे व्यसनाधितेच्या आगीत जळाली, त्यांनाच त्याचे चटके जाणवणार. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणारांना त्याची किंमत कधीच कळणार नसल्याचे जवळ यांनी म्हटले.