सातारा प्रतिनिधी । धोम, कण्हेर, उरमोडी व तारळी प्रकल्पांच्या कालवा सल्लागार समितीची उन्हाळी हंगामातील पाणी नियोजनाबातची बैठक आज जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ प्रकल्पातील पाणी व्यवस्थापनावरही सविस्तर चर्चा पार पडली. यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी “शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात अखंडित सिंचन सुविधा मिळावी यासाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर द्यावा. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात आणि संभाव्य तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन अतिरिक्त रोहित्रे तयार ठेवावीत,” असे निर्देश दिले.
विधानभवनात सन २०२४-२०२५ उन्हाळी हंगामासाठी धोम-कण्हेर, उरमोडी व तारळी प्रकल्पांचे सन २०२४-२०२५ उन्हाळी हंगामासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, विश्वजित कदम, रोहित पाटील, सुहास बाबर, सदाभाऊ खोत, अरुण लाड, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले व जलसंपदा व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, उपसा सिंचन योजना सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटी एजन्सी नेमण्यात याव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने सिंचन आवर्तन देता येईल. तसेच उन्हाळी हंगामासाठी प्रकल्पनिहाय सिंचनासाठी पाणीवापर व सिंचन आवर्तनाचे नियोजन करावे. यावेळी सांगली पाटबंधारे अंतर्गत टेंभू, ताकारी, म्हैसाळ व आरफळ व सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील धोम, उरमोडी, कण्हेर व तारळी प्रकल्पांचा आढावा घेऊन उपलब्ध पाणीसाठा, पाणी वाटपाबाबत चर्चा झाली.
आरफळ योजनेमध्ये गेल्या दोन महिन्यात पाणी सोडले नाही. ऐन उन्हाळ्यात पाणी नसल्याने, पिके धोक्यात आली आहेत. जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. आरफळ योजनेत पाणी सोडल्यास पिके वाचतील, जनतेला पिण्याचे पाणी मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर आरफळ योजनेद्वारे पाणी सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.