कराड प्रतिनिधी | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत चांगल्याच राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. सभापती विजयकुमार कदम यांनी शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. सहकार उपनिबंधक यांच्या मंजुरीनंतर राजीनामा अंतिम होऊन नव्या सभापतीची निवड करण्यात येणार आहे.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मागील वर्षी मोठ्या चुरशीने झाली. बाजार समितीतील सत्ताधारी अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील व भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी एकत्र येत त्यांच्या विरोधात पॅनेल टाकले होते. बाजार समितीच्या निवडणुकीत एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी खंबीर साथ दिली व त्यांच्या पाठीमागे ते उभे राहिले. त्याचबरोबर कराड उत्तर मधील आमदार पाटील यांचे विरोधक असलेले भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, युवा नेते मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ यांनी एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या पॅनलला साथ दिली. त्यामुळे त्यांच्या पॅनेलचा विजय सुखकर झाला होता.
कराड बाजार समिती निवडणुकीत एडवोकेट उंडाळकर व माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांच्या पॅनेलला बहुमत मिळाले. या निवडणुकीसाठी मोठे कष्ट घेतलेले एडवोकेट उंडाळकर गटाचे युवा कार्यकर्ते विजयकुमार कदम यांना पहिल्यांदा सभापती पद देण्यात आले तर उपसभापतीपदी संभाजी चव्हाण यांना संधी देण्यात आली होती. बाजार समितीच्या सभापती पदाची सर्वांना संधी मिळावी या हेतूने ठराविक कालावधीनंतर सभापती पद दुसऱ्याला देण्याचे ठरले असल्यामुळे सभापती कदम यांनी राजीनामा दिली असल्याची चर्चा आहे.